ठाणे - पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे मार्गावरील कोपर पूल वाहतुकीसाठी बंद करू नये, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पाठवण्यात आलेल्या पत्रकात ही मागणी केली आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने कमकुवत झाल्याने कोपर आरओबी बंद करण्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच दिला आहे. मात्र, हा पूल बंद झाल्यास डोंबिवली-पूर्व आणि पश्चिम परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना प्रचंड अडचण होणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायावर ही अडचण आणि नागरिकांचा त्रास टाळता येण्यासारखा असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
सध्या या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे . कोपर पुलाच्या पूर्वेकडील बाजूला रेल्वे ऑफिस, तिकीट खिडकी आणि आरपीएफचे कार्यालय आहे. येथे एक काँक्रेट पिल्लर उभे करून त्यावर फ्री कॉस्ट कॉलम टाकून त्यावर डेड स्लॅब बनवण्यासाठी अंदाजे 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तसेच डोंबिवली पश्चिम दिशेला फक्त रॅम्प बनवल्यास हा प्रश्न सुटू शकतो, अशी सूचनाही स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.
जोडीला डोंबिवली पश्चिम विभागात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 18 नगरसेवकांनीही पर्याय पुलासाठी आपल्या निधीतून 50 लाखांचा निधी दिल्यास हा पूल लवकर प्रत्यक्षात उतरू शकेल, अशी आणखी एक सूचनाही त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे डोंबिवली रेल्वे पुलाचा विषय चर्चेत येत असताना कल्याणच्या पत्री पुलाचे भिजत घोंगडे कायम असल्याचे दिसत आहे.