ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने सर्वच सणांवर त्याचा परिणाम झालेला आहे. कोरोनामुळे बाजारपेठेवर आलेली ही मरगळ फटाके व्यवसायातही दिसत आहे. या वर्षी फटाका खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी त्यांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आहे. अनेक ग्राहक पूर्वीपेक्षा फटाक्यांची कमी खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे फटाका व्यवसायात यंदा 30 टक्क्य़ांनी घट झाल्याचे फटाके विक्रेत्यांतर्फे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, खरेदीसाठी येणारे ग्राहक हे आवाजविरहित फटाके खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षी दिवाळीमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी असेल, असे बोलले जात आहे.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असल्याने गणेशोत्सव, नवरात्र या सर्वच सणांवर त्याचा परिणाम झाला. ठाणे जिल्ह्य़ातील कोपरी आणि उल्हासनगर भागात फटका विक्रीचे मोठे बाजार भरविले जातात. दरवर्षी ठाणे तसेच आसपासच्या शहरातून या फटाका बाजारात मोठय़ा प्रमाणात नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी येतात. शहरात या वर्षीही फटाके बाजार भरला असून दरवर्षीप्रमाणे गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.
लोकांनी केला खर्च कमी -
एखादा ग्राहक पूर्वी एक हजार रुपयांचे फटाके खरेदी करीत असेल तर तो यंदा सातशे ते आठशे रुपयांचे फटाके खरेदी करीत आहे. ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र, त्यांनी खरेदीचा खर्च कमी केला आहे. तसेच नागरिक आवाजांच्या फटक्यांऐवजी आवाजरहित फटाक्यांच्या खरेदीवर भर देत असून त्यामध्ये सुरसुरी, भुईचक्र व इतर फटाक्यांचा समावेश आहे, याचा 30 टक्के परिणाम व्यवसायावर झालेला आहे असे ही व्यावसायिक सांगत आहेत.