मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे भाईंदर पूर्वेमध्ये असलेले प्रमोद महाजन कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या आगोदर डेल्टा गार्डन आणि मीनाताई ठाकरे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. आता येत्या 22 जानेवारीपासून भाईंदर पुर्वेमध्ये असलेले प्रमोद महाजन कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे.
रुग्ण संख्येत घट
मीरा भाईंदर शहरात सध्या एकूण 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रुग्ण हे पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर काही जण उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. रुग्ण संख्या घटल्याने महापालिकेकडून कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. येत्या 22 तारखेला भाईंदर पुर्वेमध्ये असलेले प्रमोद महाजन कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकेने डेल्टा गार्डन आणि मीनाताई ठाकरे कोविड सेंटर बंद केले आहे.
गरज असल्यास कोविड सेंटर पुन्हा सुरू करू
गेल्या आठ महिन्यांपूर्वी कोरोना या महामारीमुळे संपूर्ण देश ठप्प झाला होता. त्याच काळात दिवसाला 100 पेक्षा अधिक रुग्ण मीरा भाईंदर शहरात आढळून येत होते. मात्र या रुग्णांवर उपचारासाठी हवी तशी सोय प्रशासनाकडे नव्हती. त्यामुळे शहरात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली. मात्र आता कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे शहरातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शहरात 332 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. भाईंदर पूर्वेच्या प्रमोद महाजन कोविड सेंटरमध्ये फक्त 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर 22 जानेवारीपासून हे कोविड सेंटर देखील बंद करण्यात येईल, भविष्यात गरज भासल्यास पुन्हा कोविड सेंटर सुरू करू अशी माहिती मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.