ठाणे - उल्हासनगरमध्ये एका 38 वर्षीय पुजाऱ्याचा मृतदेह इमारतीच्या 6 व्या मजल्यावर असलेल्या एका घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. विशेष म्हणजे पुजारी राहत असलेल्या घराला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना मारून लटकवले आहे का ? या दिशेने विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जितू शर्मा, असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे.
मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने घटना समोर
उल्हासनगर कॅम्प 4 मधील पूज्य पंचायत हॉलच्या बाजूला असलेल्या सुमन अपार्टमेंट या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मृत जितू शर्मा हा राहत होता. जितू हा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना गुरुवारी शेवटचा दिसला होता. गेली काही दिवस हा फ्लॅट बंद असून त्याला कुलूप होते. मात्र, बंद खोलीतून मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने इमारतीतील रहिवाशांनी जितूचा भाऊ अमित शर्माला फोन करून सांगितले. त्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत त्यांना याबाबत माहिती दिली.
बंद घराचे कुलूप तोडून बाहेर काढला मृतदेह
घटनेची माहिती मिळताच घटनस्थळी दाखल होऊन पोलिसांनीच बंद घराचे कुलूप तोडून घरात डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना जितू शर्मा याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी पंचनामा करत जितूचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. ही हत्या आहे की, आत्महत्या हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली.
हेही वाचा - ठाणे : एटीएसने शिक्षक रिझवान मोमीनला केली अटक