ठाणे : भिवंडी शहरातील बालाजीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह बुधवारी सकाळी एका खदाणी लगतच्या तलावात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सत्यम पन्नीलाल चौरसिया (9) व शुभम जितेंद्र चौरसिया (14) अशी मृत मुलांची नावे आहेत.
मुले काल दुपारपासून बेपत्ता होती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम चौरसिया हा बालाजी परिसरातल्या भंडारी कंपाउंडमधील यादव इमारतीत राहत होता. तर सत्यम चौरसिया हा त्याच्या शेजारील इमारतीमध्ये राहत होता. हे दोघे मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास भंडारी कंपाउंडमधील ग्लोबल हॉस्पिटलसमोरील सिद्दीकी सेठ या पडलेल्या इमारतीच्या मैदानात खेळण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही दोन्ही मुले घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलांच्या अपहरणाची नोंद करण्यात आली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले : त्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला. मात्र मंगळवारी दिवसभर मुलांचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर आज बुधवारी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरातील खदाणीलगतच्या तलावात दोन मुलांचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांची ओळख पटवली. पोलिस तपासात ही मुले सत्यम आणि शुभम असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या मृत्यूंची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू : जुलै 2022 मध्ये भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील वारणा नदी पात्रात पिकनीकसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. इम्रान रईस मन्सूरी (20) आणि सुफीयान रईस मन्सूरी (16) अशी या दोघांची नावे होती.या आकस्मित मृत्यूची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे मृतक भाऊ भिवंडी शहरातील विठ्ठलनगर भागात असलेल्या एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होते. दोघे भाऊ त्यांच्या नातेवाईकांसोबत वारणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदी पात्रात पोहत असताना इमरानला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सुफियान त्याला वाचवण्यासाठी गेला, मात्र त्यामध्ये दोघाचाही पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला.
हेही वाचा : Thane Crime: हॉटेल मालकांना चाकू धाक दाखवून लूटमार; एका गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक