नवी मुंबई : आपल्या बाळाचे संगोपन चांगल्या प्रकारे व्हावे त्याची योग्य काळजी घ्यावी हा प्रयत्न प्रत्येक आईचा असतो. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बारा-बारा तास कर्तव्यावर राहावे लागत असते. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मुलांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार याच्या प्रयत्नातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांसाठी पहिले पाळणाघर सुरू होणार आहे. यामुळे महिला पोलिसांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे.
मूल थोडे मोठे झाले की स्त्रियांना त्यांना पाळणाघरात ठेवून नोकरीवर जावे लागते. नोकरदार महिलांसाठी मुलांची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. नोकरीनिमित्त घरापासून लांब असणे, घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती नसणे, पती-पत्नी दोघेही नोकरीला असणे अशा कारणांमुळे मुलांचे योग्य संगोपन होण्यासाठी त्यांना पाळणाघरांमध्ये ठेवण्याचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बारा-बारा तास कर्तव्य बजावावे लागत असल्याने, व त्यांच्या नोकरीची वेळ नक्की नसल्याने मुलांना बाहेर पाळणाघरात ठेवण्याचेही अडचणीचे ठरते.
यावर उपाय म्हणून नवी मुंबई पोलीस मुख्यालयात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पोलीस मुख्यालय कळंबोली येथे 10 ऑगस्टला पाळणाघर सुरू करण्यात आले. सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशा पाळणाघराचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिमंडळ 1 चे उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ 2 चे उपायुक्त अशोक दुधे, पोलीस उपायुक्त वाहतूक चे सुनील लोखंडे व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील उपस्थित होते.