ठाणे Dasara Melava : एक मुहूर्त, एक मैदान, एक मंच आणि एकचं नेता! देशभरात ख्याती असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर होतो. या मेळाव्याची प्रत्येक शिवसैनिक आतुरतेनं वाट पाहत असतो. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दिवशी आपल्या तेजस्वी भाषणानं अख्ख मैदान गाजवायचे. यंदा हा मेळावा २४ ऑक्टोबरला होणार आहे.
बाळासाहेबांची खुर्ची शिंदे गटाच्या मंचावर : मात्र गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. आता बाळासाहेबांनी ज्या खुर्चीवरून २०१२ साली ठाण्यात शेवटचं भाषण केलं होतं ती खुर्ची या वर्षीही मंचावर ठेवण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय. याद्वारे शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा शिंदे गटाचा उद्देश असेल.
ही खुर्ची का खास आहे : गेल्या वर्षी शिंदे गटाचा दसरा मेळावा एमएमआरडी मैदानावर झाला होता. या मेळाव्यातही ही खुर्ची मंचावर ठेवण्यात आली होती. येथे उल्लेखनीय बाब म्हणजे, याच खुर्चीवर बसून बाळासाहेब ठाकरेंनी, 'माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा', असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. आता पुन्हा एकदा तीच खुर्ची उद्धव ठाकरे यांना विरोध करणाऱ्या शिंदे गटाच्या मंचावर पाहिल्यावर शिवसैनिकांच्या त्यावर काय प्रतिक्रिया असतील, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिलाच मेळावा : शिंदे गटाचा या वर्षीचा दसरा मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर होत असून, ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होतोय. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल.
हेही वाचा :