ठाणे - भारतीय रेल्वेला १६६ वर्ष पूर्ण झाली. पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे असा प्रवास हा ऐतिहासिक असला तरी या स्थानकाला हेरिटेजचा दर्जा मात्र अद्याप मिळालेला नाही. तर दुसरीकडे जुनाट रेल्वे पादचारी पूल मात्र रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. ठाणे पूर्व आणि पश्चिम दिशांना जोडणाऱ्या हा रेल्वेच्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीची अनेकवेळा मागणी केल्यानंतरही अद्याप कुठलीच हालचाल करण्यात आलेली नाही.
प्रथम एल्फिस्टन पुलाच्या दुर्दैवी घटनेने आणि आता सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेने रेल्वेच्या जुनाट पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरी पब्लिक पूल हा हालत असल्याच्या तक्रारी प्रवाशी संघटनेने केल्या. मात्र, रेल्वे पालिकेकडे बोट दाखवीत आहे. तर पालिका रेल्वेकडे बोट दाखवीत आहे. या बोट दाखवण्याच्या जुगलबंदीत लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
ठाणे रेल्वेच्या कल्याण दिशेला कोळीवाडा रेल्वे पूल आणि मुंबईच्या दिशेला कोपरी ब्रिज आहे. ठाणे पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा हा रेल्वेचा पब्लिक ब्रिज ठाणे स्थानकातील जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मला जोडलेला आहे. त्यामुळे या पब्लिक ब्रिजवरून रोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. पब्लिक ब्रिजवरून प्रवासी हा इच्छुक स्थानकावर जातो. तर दुसरा ब्रिज हा कल्याण दिशेला पब्लिक ब्रिज आहे. हे दोन्ही पब्लिक ब्रिज हे पालिकेच्या अखत्यारीतयेतात.
रेल्वे प्रशासनातर्फे या दोन्ही पब्लिक ब्रिजमधील रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या कल्याणच्या दिशेच्या ब्रिजच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. त्याचे भूमिपूजनही झाले. तो दुरुस्त झाल्यानंतर मुंबईकडीलरेल्वेचा ब्रिज दुरुस्त करण्यात येणार आहे. दरम्यान, दुरुस्तीसाठी रेल्वेचा ब्रिज बंद केल्यानंतर मुंबईकडील पब्लिक ब्रिजवर अधिक ताणपडत आहे. रेल्वे गाड्या गेल्यानंतर हादरनारा पूल मुंबईकडील पब्लिक ब्रिज असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी संघटनेद्वारे करण्यात आली. या ब्रिजच्या दुरुस्ती करायची कुणी? याचे घोंगडे भिजत पडले आहे. पालिका रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवीत आहे. तर रेल्वे प्रशासन मात्र पालिकेकडे बोट दाखवीत आहे. या टोलवाटोलवीत मुंबईकडे पब्लिक ब्रिजची आणि लाखो प्रवाशांचीसुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. या ब्रिजच्या पायऱ्याही निखळलेल्या असून प्रवाशांचा पाय अडकून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा तक्रारी नागरीक आणि प्रवासी संघटनांमधून समोर येत आहे.