ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या सरकारी यंत्रणेला अवकाळी पावसाने झालेल्या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आधीच विलंब लागला. पंचनाम्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष पंचनामे नोंदवण्याच्या प्रक्रियेला अवघे 2 दिवस उलटत नाही. तोच दिवाळी सुट्टी लागल्याने शनिवार ते मंगळवार या 4 दिवसांच्या दिवाळी सुट्टीमुळे शहापूर तालुक्यात भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे नोंदवण्याचे काम रखडले आहे. तर परतीच्या पावसामुळे दुबार भाजीपाला लागवडही लांबली आहे. तर वीटभट्टी व्यवसायही संकटात आला आहे.
जिल्ह्यात 10 दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने रविवार व सोमवार असे 2 दिवस काही भागात उसंत दिली होती. परंतु, मंगळवारी पहाटे पावसाने पुन्हा हजेरी लावून 2 दिवस शेतात कापून वाळण्यासाठी पसरवून ठेवलेले भातपिक भिजवून टाकले. त्यामुळे भातपिकांचे नुकसान तालुक्यात मंगळवारपर्यंत कायम आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी संयुक्तपणे गावागावांत जाऊन सरपंच व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आतापर्यंत काही तालुक्यातच कमी अधिक पंचनामे नोंदवले आहेत.
हेही वाचा - 'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम
जिल्ह्यात अवकाळी पावसाने भाताच्या दाण्यांचे दाट पिवळे तुरे घेऊन उभ्या राहिलेल्या भातपिकांना जागीच मातीत मिळवले आहे. पिकलेल्या धान्याचा शेतातच चिखल झालेला पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. जिल्ह्यात आदिवासी तसेच डोंगरी विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेल्या नागळी आणि वरईचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या नागळी, वरईच्या बोंडांनी जमिनीकडे मान झुकवली आहे. शहापूर तालुक्यातील टाकीपठार, डोळखांब आणि कसाऱ्याच्या माळपठार, वेळूक, वाशाळा, तळवाडा, गांडुळवाड, साकडबाव, बाबरवाडी, चिल्लारवाडी या भागातील डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात नागळी आणि वरईची लागवड केली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेने यंदाच्या हंगामात ही पिकेदेखील भरघोस पिकली होती. मात्र, अवकाळी पावसाच्या फटकाऱ्याचा फटका नागळी, वरईलादेखील बसला आहे.
हेही वाचा - खळबळजनक! सीएनजी गॅस भरताना पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट