मुंबई : महाराष्ट्रात यावर्षी साजरा होणारा दहीहंडी उत्सव, समस्त तरुण वर्ग, बाळगोपालांचा आवडता सण आहे. समस्त बालगोपाळांच्या उंच थरामुळे सदर उत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात येतात. उत्सवाचे प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक प्रयत्न करीत असतात. त्याच अनुशंगांने आज दहिहंडी मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. दहिहंडी मंडळाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मंडळाने भेट घेतल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.
गोविंदा पथकांच्या मागण्या : बालगोपाळांचा विमा महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षीसुद्धा उतरवण्यात यावा अशी मागणी मंडळाने केली आहे. दहीहंडीस साहसी खेळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. परंतु याबाबत शासनाकडून पुढे काही उपाययोजना झाली नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली. साहसी खेळासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन साहसी खेळासाठी स्पर्धाचे आयोजन करावे अशीसुद्धा मागणी त्यांनी केली. दहीहंडी आयोजन करण्यासाठी आयोजकांवर काही जाचक अटीबाबत शिथिलता आणावी. दहीहंडी उत्सवासाठी महाराष्ट्रातील समस्त गोविंदा पथक जवळजवळ महिना/ दीड महिना सराव करतात. परंतु वेळेअभावी त्यांचे कौशल्य जास्तीत जास्त ४ ते ५ दहीहंडी मंडळालाच दाखवू शकतात. तरी सदर उत्सवाची वेळ आपण रात्री १२.०० पर्यंत केल्यास सर्व गोविंदा पथकांना फायदा होणार असल्याची मागणी मंडळाने केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. गोविंदा पथक, आयोजक यांच्यावर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी देखील मागणी मंडळाने उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या बैठकीत ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, गोविंदा पथकाचे प्रमुख पदाधिकारी अरुण पाटील, कमलेश भोईर, संदीप ढवळे, समीर पेंढारे, निलेश वैती, रोहिदास मुंडे, नितीन पाटील, रवींद्र पालव,संदीप पाटील, किरण जमखंडिकर, अतुल माने, मनोहर सालावकर, राहुल पवार, विवेक कोचरेकर, आप्पा जाधव, नागेश पवार आदी मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित होते.