ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लाॅकडाऊन जारी केला असतानाही समाजातील काही अपप्रवृत्तीकडून प्रशासनाच्या उपाययोजनांवर खालच्या पातळीवर येऊ टिका टिप्पणी केल्याचे प्रकार सोशल मिडीयातून वाढीस लागले आहेत. कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी ठाणे महापालिकेकडून 5 हजार रुपये उकळले जात असल्याची दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर प्रसारीत करण्यात आली होती. योगेश गावडे नामक व्यक्तीने, हा म्हणजे ठाण्याच्या महापौरांचा भ्रष्टाचार असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याची गंभीर दखल घेत पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी देशपांडे यांनी या व्यक्तीविरोधात नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी संबधीत व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने आपण लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलो असून, स्वॅब तपासणीबाबतची वस्तुस्थिती मांडल्याची कबुली दिली. अशी माहिती नौपाडा पोलीसांकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत आहे. पालिकेच्या तसेच, शासकिय रुग्णालयात कोरोना संशयितांची मोफत तपासणी केली जात आहे. तरिही योगेश गावडे नामक व्यक्तीने 7 एप्रिल रोजी आपल्या फेसबुकवर ठाणे महापालीकेमार्फत स्वॅब तपासणीसाठी 5 हजार रुपये उकळले जात आहेत. अशी दिशाभूल करणारी खोटी माहिती पसरवून जनमानसात अफवा पसरवली. त्याचबरोबर, महापौरांना उद्देशून दलाल, चोर संबोधले. जनतेला वेठीला धरून यातही 'हे' दलाली खाऊन बेहिशोबी मालमत्ता जमवतील. अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याची दखल घेत महापालिकेच्या वाडीया रुग्णालयाच्या वैदयकिय अधिकारी अश्विनी देशपांडे यांनी थेट नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.