ठाणे- भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी धान्य वितरण कार्यक्रम आयोजित केला. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हेत. शेकडो महिला दाटीवाटीने एकत्रित जमल्या होत्या. त्यामुळे संचारबंदीच्या काळात जमाव जमवून कायद्याचेही उल्लंघन याठिकाणी झाले आहे.
हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळायचा असल्यास प्रत्येकाने एक दुसऱ्यापासून ठराविक अंतर राखणे गरजेचे आहे. हाच या विषाणूला रोखण्याचा जालीम उपाय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली. तर प्रधानमंत्री मोदी यांनी 21 दिवसांकरिता लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा आरोग्य व पोलीस विभाग दिवस रात्र कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी किराणा, भाजीपाला व दूध विक्रेतेच्या दुकानाबाहेर अंतर राखून ग्राहाकांनी शिस्त पाळावी यासाठी दुकानसमोर रिंगण आखून देत आहेत. तर भिवंडी शहरात वास्तव करीत असलेले परराज्यातील लाखो स्थलांतरित कामगार आजही धान्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. या कामगारांना लॉकडाऊनच्या काळापासून शहरातील अनेक सेवाभावी संस्था विविध राजकीय पक्ष पदाधिकारी गर्दी टाळण्यासाठी या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था तसेच धान्य घरोघरी जाऊन वितरीत करीत आहे.
तर दुसरीकडे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी शहरातील अवचित पाडा रोडवरील खंडूपाडा परिसरात धान्य वितरण कार्यक्रम घेतला. मात्र, याठिकाणी जमलेल्या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही.
संचारबंदी काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे कायद्याद्वारे नागरिकांना बजावले जात असतानाच या कार्यक्रमात महिलांना एकत्रित करुन या कायद्याचेही उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.
भिवंडी शहरात लाखोंच्या संख्येने स्थलांतरित कामगार असून हजारो कामगार कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही. याही कामगारांना सरकारने अन्न-धान्य पुरविले पाहिजे होते. मात्र, या कुटुंबीयांची होणारी परवड पाहून भिवंडी शहरात धान्य वितरण करावे लागत असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच भिवंडी शहरातील विविध भागात पक्ष कार्यकर्ते त्या-त्या ठिकाणी जाऊन धान्य वितरण करीत आहेत. त्यामुळे गरजू नागरिकांकडून मागणी वाढली असल्याने, हे धान्य वाटप होत असल्याचे शेख यांनी सांगितले.