कल्याण डोंबिवली (ठाणे) - एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यासाठी घोषणांचा पाऊस पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्याच शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना स्वॅब (घशातील स्त्राव) चाचणीसाठी रुग्णांनी भर पावसात रांग लावत गर्दी करुन सामाजिक अंतराच्या नियमांला हरताळ फासल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
विशेष म्हणजे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या लॅबबाहेर रांगा लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शेडची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाचा पाण्यापासून बचाव करण्यासाठी या नागरिकांनी सामाजिक अंतराचे नियम झुगारून आडोसा शोधत गर्दी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अस्तित्वात असलेल्या कोविड रुग्णालयात रुग्नांना आधी आरोग्य सुविधा द्याव्यात. त्यानंतर 300 आणि 500 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याच्या घोषणा कराव्यात, अश्या संतप्त प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
याबाबत रुग्णालय प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगण्यात आले. तर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगत बोलणे टाळणे.
हेही वाचा - चिंताजनक..! कल्याण डोंबिवलीत एका दिवसात वाढले 560 कोरोनाबाधित रुग्ण