ठाणे : कल्याण पश्चिमेकडील गजबजलेल्या बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये चोरीची घटना आज (रविवारी) सकाळी उघडकीस आली आहे. ज्यामध्ये चोरट्यांनी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून आता प्रवेश केला. यानंतर दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून तिजोरीतील लाखोंचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील रहिवासी आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सहा लाखांचे दागिने लंपास: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार मोहिते यांच्या मालकीचे कल्याण पश्चिमेकडील गजबजलेल्या बिर्ला कॉलेज परिसरात मुख्य रोडवरच महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोने-चांदीच्या दागिने विक्रीचे दुकानात आहे. त्यातच १८ ते १९ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या लगत असलेल्या दोन बंद रिकाम्या गाळ्याची भिंत फोडली. यानंतर गॅस कटर आणि सिलिंडरसह आत प्रवेश केला आणि गॅस कटरच्या साहय्याने तिजोरी कापून त्यामधील सहा लाखांचे दागिने लंपास केले. खळबळजनक बाब म्हणजे, ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर आणि डीव्हीआरची तोडफोड केली. यानंतर चोरट्यांनी गॅस कटर आणि सिलिंडर घटनास्थळी सोडून पळ काढला.
मुख्य लॉकर राहिले सुरक्षित: दुकानाचे मालक मोहिते नेहमी प्रमाणे १९ ऑगस्ट रोजी दुकानात उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. दुकानाच्या आत जाऊन त्यांनी पाहिले असता त्याठिकाणी गॅस कटर आणि सिलिंडर आढळून आले. दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडल्याचेही त्यांना कळले. परंतु, चोरटे दुकानातील मुख्य लॉकर फोडू शकले नाही. कदाचित गॅस संपल्याने त्यांना लॉकर तोडता आला नाही; मात्र दुकानाच्या शोकेसमधील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे दिसून आले.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल: एकूण सहा लाखांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी दुकान मालक राजकुमार मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. गायकवाड करीत आहेत.
हेही वाचा: