ठाणे: प्रेम माणसाला आंधळं बनवत ऐकलं असेल; मात्र हेच प्रेम अट्टल चोरही बनवत असल्याचं एक उदाहरण आज ठाण्यात समोर आलंय. मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील टोकावडे येथील 32 वर्षीय युवक गणेश म्हाडसे याचे एका तरुणीवर प्रेम होते. प्रेमात अखंड बुडालेल्या गणेशने प्रेयसीवर प्रचंड पैसे खर्च केले. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. आता हे कर्ज फेडायचं कसं याचा विचार करत असतानाच त्याने बाईक चोरी करण्यास सुरुवात केली. ठाणे शहर आणि आसपासच्या भागात तो बाईक चोरायचा आणि मुरबाड मधल्या ग्रामीण भागातील नागरिकांना नंबर प्लेट बदलून स्वस्तात विकायचा.
कर्ज फिटले, पण...: चोरीच्या बाईक विक्रीतून त्याचे कर्ज फिटले; मात्र त्याला पैशांचा हव्यास सुटला आणि तो बाईक चोरी करतच सुटला. इतका की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर अशा ठिकठिकाणी त्याने दुचाकी चोरून त्या मुरबाडच्या ग्रामीण भागात विकल्या. कळवा रुग्णालयातील एका बाईक चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये हा तरुण दिसून आला. त्याचा मागोवा घेत पोलिसांनी थेट टोकावडे गाठलं आणि या अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या.
अटकेनंतर मिळाल्या १५ दुचाकी: पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या अधिक चौकशीमध्ये गणेश म्हाडसे या आरोपींकडून 15 चोरी केलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्या साथीदाराला सुद्धा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा अधिक तपास कळवा पोलीस करत आहे.
म्हणून ग्राहकीही वाढली: या चोरी केलेल्या वाहनांना स्वस्तामध्ये विकल्यामुळे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या दुचाकी घेत होते. त्यांना लवकरच पेपर तुमच्या नावावर करून दिले जातील, असे आश्वासन देखील या चोरट्यांकडून दिले जायचे. म्हणूनच या दुचाकींची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत होती. त्यातून मिळणाऱ्या रोख रक्कमेवर मजा मारण्याचे काम हे आरोपी करत होते. यापूर्वीही कर्ज फेडण्यासाठी काही युवकांनी वाहन चोरीचा मार्ग पत्करल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा: