ठाणे : मीरा भाईंदरमध्ये एकाच दिवशी कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५६ जणांना कोरोनाची लागण झाली. मंगळवारी १०४ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २३ हजार ३२२ जणांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. यामध्ये १५ हजार १८४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर ७ हजार ८३८ जणांचा पॉझिटिव्ह आला आहे.
मीरा भाईंदर शहर कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, दिवसागणिक कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. मीरा भाईंदर शहरात मंगळवारी ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची एकूण संख्या २६१ झाली आहे. तर शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. एकूण ५ हजार ८७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये ६९ नवीन तर ८७ जणांना कोरोनाबाधितांचा संपर्कामुळे लागण झाली आहे.
सद्यपरिस्थितीत ३०० जणांचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. तर १ हजार ७०५ जणांवर मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील मंगळवारची कोरोना परिस्थिती -
राज्यात मंगळवारी १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे.
राज्यात मंगळवारी ७ हजार ७१७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ९१ हजार ४४० अशी झाली आहे. मंगळवारी नवीन १० हजार ३३३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ४४ हजार ६९४ सक्रिय रुग्ण आहेत.