ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. मात्र, ठाण्यातील उच्चशिक्षित असेलेल्या वधू-वरांनी आईवडिलांच्या उपस्थित तोंडाला मास्क बांधून घरच्या घरी आपला विवाह सोहळा आटोपला. त्यानंतर, लग्न सोहळ्यासाठी ठेवलेल्या रक्कमेतून शेकडो निराधारांना जेवणाची पाकिटे वाटून आपला आगळा वेगळा लग्न सोहळा पार पाडला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून लॉकडाऊन कधीपर्यंत संपेल याची कल्पना नाही. भिवंडीच्या पडघा गावातील बालाजीनगर येथील नयन नवशा भोईर यांनी आईवडिलांच्या उपस्थित घरच्याघरी आपला विवाह सोहळा पार पाडला. नयन भोईर हे अभियंता असून त्याची पत्नी प्राची या संगणक प्राध्यापक आहेत. दोघे उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता समाजामध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले लग्न सरकारी नियमांचे पालन करुन केले.
यामुळे विवाह सोहळ्यातील रक्कमेतून मुंबई-नाशिक महामार्गावरील पायी जाणारे मजूर आणि गावातील निराधारांना जेवण आणि धान्याचे वाटप या नवविवाहित जोडप्याने केले.