ठाणे - शेअर्स बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही तुमच्या महत्त्वाची बातमी आहे. कारण बंटी-बबलीच्या जोडीने एका व्यापाराला गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोघा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलवंत कुमार सिंग व सुचिता नागर अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे राहणारे देवेंद्र शर्मा या ६७ वर्षीय व्यक्तीची आरोपींनी फसवणूक केली आहे. कुलवंत कुमार सिंग व सुचिता नागर (दोघेही राहणार डोंबिवली) या जोडीने २०१४ साली एका कंपनीमार्फत शेअर्स बाजारात पैसे गुंतवणूक करण्याचा शर्मा यांना सल्ला दिला. तसेच शर्मा यांच्यासह त्यांच्या पत्नीचे कंपनी मार्फत ट्रेडिंग खाते उघडून दिले. हे खाते ऑपरेट करण्याबाबत दिशाभूल करून आरोपींनी चुकीची माहिती दिली. खाते ऑपरेट करण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून परवानगी पत्र घेतले. त्यानंतर शर्मा यांच्या नकळत त्यांच्या खात्यावरून शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत.
शेअर्स तोट्यात असताना आरोपींनी शेअर्स विक्री केली. तसेच खात्याचे बनावट स्टेटमेंट बनवून शर्मा व त्याच्या पत्नीची तब्बल ५० लाखांची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच शर्मा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कुलवंतकुमार सिंग, व सुचिता नागर या बंटी -बबली विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.