ठाणे - ठाण्यातील महत्वाची समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे आता कोपरी पुलाच्या दुरुस्तीला शुभारंभ करण्यात आला आहे. राजकीय पुढारी आणि प्रशासनाने ठाणे-मुंबईला जोडणाऱ्या या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु केले. कोपरी रेल्वे पूलाचे गर्डर टाकण्याचे काम शनिवारी सुरू झाले. याठिकाणी एकूण सात गर्डर टाकण्यात येत आहे. 35 मीटर लांब आणि प्रत्येकी 35 टन वजनाचे हे गर्डर आहेत. क्रेनच्या साहाय्याने हा गर्डर उचलण्यात आला. पुढील आठवड्याभरात रेल्वेकडूनही गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.
रस्ता रुंदीकरणाचे काम
सुमारे तीन महिन्यात मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. 2011 ला हा ब्रीज रेल्वेने धोकादायक ठरवला होता. दोन वर्षांपूर्वी या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वेकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. ठाण्याच्या या कोपरी भागाला वाहतूक कोंडीसाठी ओळखले जात होते. रेल्वे प्रशासनाने लक्ष न दिल्याने या पुलाचे काम रखडले होते. भाजप सरकारच्या काळात या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली होती.
14 कोटींचा रस्ता झाला 258 कोटींचा
सरकारी अनास्था आणि समन्वय न झाल्याने या कामाची 14 कोटींची किंमत वाढून 258 कोटी झाली. याला रेल्वे प्रशासन जबाबदार असुन त्यांच्यामुळे हा प्रकल्प झाला नाही, असा आरोप स्थानिक करत आहेत.
हेही वाचा - लसीकरण मोहीम रद्द नव्हे, २ दिवस स्थगित -आरोग्य विभागाचा खुलासा