ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी 4 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एक महिला रुग्णाचा आधारकार्डावरील पत्ता कल्याण येथील होता. ही महिला गेल्या 10 महिन्यांपासून माहीम येथे राहत असल्याचे समजले. तरीही आजपर्यंत कल्याण-डोंबिवलीमध्ये संबंधित महिला वगळून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14वर येऊन ठेपली आहे.
कल्याण-शिळ मार्गावरील गावात एक रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण तेथी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असल्याने तो राहत असलेल्या परिसरात तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले आहेत. उर्वरित 3 पैकी 2 रुग्ण डोंबिवलीतील आहेत, तर 1 रुग्ण कल्याण पश्चिमेकडील परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांच्या 7 निकटवर्तीयांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रूग्णांच्या परिसरात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कंटेंटमेंट प्लॅन तयार करण्यात आला असून, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे.
सद्याच्या घडीला महापालिका क्षेत्रात 513 नागरिकांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यापैकी 317 नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी संपला असून, उर्वरित नागरिकांची महापालिकेमार्फत दैनंदिन चौकशीही करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रूग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
डोंबिवली पूर्व परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनुसार डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी व आहिरे गाव, सहकारनगर हे भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. तेथील रहिवाशांनी घरातून बाहेर पडू नये. महानगरपालिकेचे भरारी पथकसुद्धा त्या परिसरात असतील त्यामुळे शक्यतो नागरिकांनी सहकार्य करावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे. नागरिकांना लागणारे किराणा सामान, भाजीपाला आणि औषधे घरी पोहोचवली जातील त्यामुळे प्रभागातील दिलेल्या दुकानदारांच्या दूरध्वनी क्रमांकाला संपर्क साधून, आपल्या सोयी पूर्ण कराव्यात. महानगरपालिकेला आपल्या सहकार्यची अपेक्षा आहे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.