ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा रुग्ण गेल्या दोन तासाहून अधिक वेळ फुटपाथवर तडफडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अखेर दोन तासानंतर या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या रूग्ण संख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. त्यातच शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी २ तासाच्या कालावधीनंतर या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी आले. मात्र त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आयसीयूमध्ये सदर रुग्ण उपचार घेत होता. मात्र आयसीयूमध्ये 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता. हे मृतदेह बाहेर काढण्यात रुग्णालयातील कर्मचारी व्यस्त असल्याचा फायदा घेत हा रुग्ण पळून गेला. मात्र रुग्णालयात गर्दी असल्याने त्याची माहिती मिळण्यास उशीर झाला. त्यांनतर माहिती मिळताच त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात यापूर्वी रुग्णांबाबत अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. मात्र महापालिका प्रशासन यावर उपाययोजना करण्यात सपशेल फेल गेल्याचे या धक्कादायक घटनेवरून दिसून आले आहे. याबाबत डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आरोग्य विभागाने मनात आणले तर कोरोना नियंत्रणात आणू शकतात. मात्र त्यांची मानसिकता नाही. या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.