ठाणे - परदेशागमन करणाऱ्यांपाठोपाठ कोणताही प्रवास न केलेल्यांनाही कोरोनाची लागण होऊ लागल्याने, कोरोनाच्या समूह संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता कोरोना विरूद्ध लढत असलेल्या पोलीस दलातच कोरोनाने शिरकाव केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 50 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
यातील मुंब्रासारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह तब्बल 42 जण कोरोनाबाधित आहेत. अन्य एका पोलीस ठाण्यातील आरोपींसह काही पोलिसांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वाना 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या संवेदनशील मुंब्रा परिसरात तबलिघी जमातीसह, बांगलादेशी व मलेशियन लोक वास्तव्यास आले होते. त्यानंतर मुंब्रा भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या कालावधीत तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर, या अधिकाऱ्याच्या संपर्कातील 12 ते 13 पोलीस अधिकाऱ्यांसह 42 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.
मारहाण प्रकरणातील आरोपींना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. या अटकेतील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासह काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.