ठाणे- अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी गावात वास्तव्याला असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरने तीन ठिकाणी वास्तव्य केल्याचे उघड झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नेवाळी ग्रामपंचायतीकडून हे तिन्ही परिसर सील करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. गेल्या आठवडाभरात ग्रामीण भागामध्येही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. नेवाळी गावातील एक डॉक्टर मुंबईतील एका रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता नेवाळी परिसरात देखील कोरोनाने प्रवेश केला आहे.
नेवाळी ग्रामपंचायतींने परिसरातील सर्व दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. नेवाळी परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकान आणि खत, बियाणांची दुकाने सोडून सर्व दुकान बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरने नेवाळी मधील आत्माराम नगर ,नेवाळी गाव आणि द्वारली मध्ये वास्तव्य केले आहे. त्यामुळे नेवाळी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने परिसरात जंतूनाशक फवारणी करून परिसर सील केला आहे