मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर शहरात शुक्रवारी(३१जुलै)एकाच दिवशी ३२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकूण कोरोना मुक्तांची संख्या ६ हजार ६७९ झाली आहे. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.
मीरा भाईंदर हद्दीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना आज शहरासाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. कोरोनाबधितांची संख्या साडेसात हजार पार झाली असली तरी कोरोनामुक्तांची संख्या ६ हजार वर पोहोचली आहे. आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २५ हजार ५७० जणांनी कोविड चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १६ हजार ५०२ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. तर ८ हजार ३१४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
काल (३१ जुलै) शुक्रवारी शहरात १२७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ जणांचा उपचारा दरम्यान कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूची एकूण संख्या २७४ वर पोहोचली, ७५४ जणांचा कोविड १९ चा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे.१३६१ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ७७ नवीन रुग्ण तर ५० जणांचा कोरोनाबधितांचा संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे, अशी माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
मीरा भाईंदर शहरात टक्केवारी नुसार कोरोनावर उपचार घेत असलेल्याची टक्केवारी १६.३७ टक्के आहे. मृत्युदर ३.३०टक्के तर कोरोनामुक्तांची टक्केवारी ८०.३३ आहे.कोरोना मुक्तांची संख्येत वाढ होत असल्यामुळे शहरातील नागरिकांमधील चिंता कमी होताना दिसत आहे.