ठाणे - कंटेनरमधून कोळसा खाली करत असताना कंटेनरचा शॉकअप्सर अचानक तुटला. त्यामुळे कोळशाने भरलेली ट्रॉली मजुरांच्या झोपडीवर कोसळली (Container trolley crashed on House). या भीषण अपघातात झोपेत असलेल्या तीन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू (Three sisters killed) झाला आहे. ही घटना 25 जानेवारीला रात्री भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील टेंभिवली गावात असलेल्या वीटभट्टीवर घडली आहे.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. सुरेश पाटील असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तर मृत्यू झालेल्या बहिणी ७ वर्षीय, ५ वर्षीय आणि ३ वर्षीय वयाच्या होत्या.
- मृत मुलींच्या वडिलांची विनंती अमान्य केल्याने गेला जीव -
भिवंडी तालुक्यात टेंभिवली गावात एका वीटभट्टीवर बालाराम वळवी हे गवताने उभारलेल्या झोपडीत आपल्या पत्नी व चार मुलांसह राहतात. 25 जानेवारीला रात्रीच्या सुमारास कुटुंबातील मुलं झोपली होती. त्याच सुमाराला त्यांच्या झोपडीलगत वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा कंटेनरमधून खाली केला जात होता. मात्र, त्यावेळी वळवी यांनी वारंवार ट्रक चालक व वीटभट्टी मालकाला विनंती करून सांगत होते की, झोपडीत मुलं झोपली आहेत. तर पत्नी जेवण करत आहे त्यामुळे काही प्रमाणात कोळसा आमच्या झोपडीत येत आहे. मात्र, विनंती करूनही हा कोळसा झोपडीलगत उतरवला जात असतानाच अचानक कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहित कोळसा थेट झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत वळवी कुटुंब अक्षरशः कोळशाखाली गाडले गेले. मात्र, या अपघातातून वळवी व त्यांची पत्नी व एक लहान चिमुकला यांना बाहेर काढण्यात स्थानिक मजुरांना यश आले.
- उपचारापूर्वीच तिघींचा मृत्यू -
अपघातात तिन्ही मुली लोखंडी ट्रोलीसह कोळशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. तर अपघात होताच इतर मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन कोळसा हटवत ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढले. मात्र तिघीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. मात्र येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिघींना मृत घोषित केले.
- संतप्त जमावाकडून कंटेनरची तोडफोड -
दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड केली आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक सुरेश पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय वीटभट्टी मालक, ट्रक मालक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी वीटभट्टी मालकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.