ठाणे - उत्तरप्रदेशमधील राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्की प्रकरणाचे पडसात मीरा भाईंदरमध्ये पहायला मिळाले. मीरारोड येथे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करत योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आज राहुल गांधी जात असताना रस्त्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी मज्जाव केला तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. यामुळे देशभर आज काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होताना दिसत आहे. मीरा रोड येथील रसाज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून वाहने रोखली. यावेळी, योगी सरकारवर सडकडून टीका करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता त्यानंतर उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. कुटुंबीयांना न कळवता मृतदेह मध्यरात्री तिचे शव जाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज तिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी गेले असता जी वागणूक उत्तरप्रदेश पोलिसांनी दिली त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाअध्यक्ष प्रमोद सामंत यांनी दिली.