ठाणे - तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या पाशवी अत्याचाराच्या घटनेचे पडसाद देशात सर्वत्र उमटले. दिल्लीतील निर्भया, मुंबईतील शक्ती मिल, या घृणास्पद घटनांनंतर तेलंगणा राज्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून मृतदेह जाळण्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हैदराबाद बलात्कार पीडितेला श्रद्धांजली देण्यासाठी ठाण्यात कँडल मार्च काढला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.
देशभरात महिला आणि मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. या घृणास्पद घटना पाहता शासनाचा आणि कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही, असे दिसते. रामराज्य आणू पाहणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी कँडल मार्च दरम्यान मोहसीन शेख यांनी केली.
हेही वाचा - ठाण्यात सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन; हजारो नागरिकांसह गजानन महारांजाचे नातूही होते उपस्थित
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेख यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या शासकीय विश्राम गृहापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कँडलमार्च काढून हैदराबाद बलात्कार पीडितेला श्रद्धांजली वाहिली. या कँडलमार्चमध्ये महिला आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक हातात घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.