ठाणे - शिवसेना आणि ठाणे हे अतूट नाते आहे. ठाण्याचा विकास बघितल्यानंतर अभिमानाने ऊर भरून येतो. हा विकास इतर शहरांना निश्चितच आदर्श ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या विविध नागरी विकास कामांचा ई-भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीनहातनाका येथील भव्य स्मारकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या हे स्मारक साकार झालेले आहे. त्यामध्ये ठाण्यासह देशातील तरुण व भावी पिढीला शिवसेनाप्रमुखांचा संपूर्ण इतिहास व जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती कायमस्वरुपी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तीक व प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके व भाषणाच्या सीडीज आदींचा संग्रह ठेवण्यात आला आहे. महापालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी भरभरून कौतुक केले.
ठाण्यातील मंजूर क्लस्टर योजनेतंर्गत किसननगर येथील पहिल्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून आपला जीव मुठीत धरून जगत असलेल्या नागरिकांची सुटका झाली असून त्यांना सर्व सोईनियुक्त असे मालकीचे घर मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून या योजनेचा पाठपुरावा होत असून याबाबतचे पहिले निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते. त्याच योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री म्हणून मला करता आले. मात्र, याचे सर्व श्रेय नागरिकांचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'ग्लोबल इम्पॅक्ट हब'चे ई उद्घाटन व 'संकेतस्थळाचे अनावरण', कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, खाडी किनारा विकास प्रकल्प, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकलप, शहरी वनीकरण प्रकल्प तसेच विज्ञान केंद्र प्रकल्प आदी प्रकल्पांचा ई-भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न झाला. तर ठाणे शहराच्या विकासाचा आढावा घेणाऱ्या 'पथदर्शी विकासाचे ठाणे' या कॉफीटेबलचे प्रकाशनही करण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाना बीएसयूपी योजनेतंर्गत 'सदनिका व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले. अनाथ, निराधार, आश्रय नसलेली बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदान वाटप करण्यात आले. तर लाडकी लेक योजनेतंर्गत प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुदानाचे वाटप करण्यात आले. ठाण्याच्या विकासात सर्वांचेच योगदान असून यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापौर संजीव जयस्वाल, महापौर नरेश म्हस्के व माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांना सन्मानित करण्यात आले.
ठाण्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या तसेच ठाणेकरांच्या मागण्या मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व पोलिसांसाठी 10 टक्के सदनिका नवीन गृहनिर्माण प्रकल्पामध्ये राखीव ठेवण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केल्या. तर एमएमआर अंतर्गत येणाऱ्या इमारतींचाही पुनर्विकास करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासाचा धावता आढावा घेतला. महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात प्रथमच आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत ठाणे महापालिकेचे शासन दरबारी प्रलंबीत असलेले विषय मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला. रोजगारनिर्मितीसाठी ठाणे शहराला विविध प्रकल्प देण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त संजीव जयस्वाल यांचे कौतुक -
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्याचा विकासाचा ध्यास घेवून धडाडीने जे काम केले आहे, ते खरोखरच उल्लेखनीय आहे. मी स्वत: ठाणेकर आहे, या दृष्टीने त्यांनी ठाण्याचा सर्वकष विकास घडविला आहे. त्यामुळे निश्चितच ते ठाणेकरांच्या कायम लक्षात राहणार आहेत यात शंका नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयुक्तांना सन्मानित केले.
ठाण्यात लाखो नागरिक आजही आपला जीव धोक्यात घालून राहतात. वर्षानुवर्षे आपला संसार अतिधोकादायक घरात मांडत जगत आहेत. पण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज क्लस्टर योजनेचे उद्घाटन झाल्यामुळे भविष्यात चांगल्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. याबाबत एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी समाधान वक्त केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'या' प्रकल्पांचे झाले ई-उद्घाटन -
- ग्लोबल हब
- ठाणे इम्पॅक्ट ग्लोबल हब संकेत स्थळ
- कंट्रोल अॅण्ड कंट्रोल सेंट्रल ठाणे
- वॉटर फ्रंट प्रकल्प
- बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
- घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती
- बांधकाम आणि तोडफोड पुनर्कचरा व्यवस्थापन
- शहरी वनीकरण
- सायन्स सेंटर पार्कचे उद्घघाटन
- बीएसयुपी योजनेंतर्गत सदनिका वितरण
- दिव्यांगाना रोजगार स्टॉलचे वितरण
- एचआयव्ही बाधित तरुणांना रोजगारासाठी आर्थिक मदत
- लाडकी लेक दत्तक योजनेतील अनुदान