ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादरम्यान डोंबिवलीतील फडके रोडवर असलेल्या मनसे कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही मनसेच्या कार्यलयात उपस्थित होते. शिवाय डोंबिवलीचे भाजप आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांचाही सत्कार मनसे आमदार राजू पाटील यांनी केला. एकंदरीतच शोभा यात्रेच्या निमित्ताने भाजप, शिवसेना, मनसेची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
डोंबिवलीतील शोभायात्रेला यंदा २५ वर्ष : गुडीपाढवा निमित्ताने आयोजित डोंबिवलीतील शोभा यात्रेला यंदा २५ वर्ष होत आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ही शोभा यात्रा सकाळी साडे सहा वाजता सुरू झाली. तर डोंबिवली पश्चिमेकडील गणेश मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शोभा यात्रेत विविध सामाजिक संघटनासह अनेक शाळांच्या वतीने सामाजिक संदेश देणारे चित्ररथ ढोल-ताशा, लेझिम पथकांचा गजर, टाळ-चिपळ्या घेऊन भजन गाणारी मंडळे सहभागी झाल्याने डोंबिवली नगरी पहाटेपासून दुमदुमून गेली होती.
शोभायात्रेतील पालखीला खांदा : शोभायात्रेत आनंदोत्सव सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरात शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आगमन झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही शोभायात्रेतील मानाची पालखीला खांदा देत, इंदिरा चौक ते गणेश मंदिरदरम्यान मुख्यमंत्री शोभायात्रेत पायी चालले होते. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन गोपी सिनेमा, हाॅटेल सम्राट, पंडित दीनदयाळ रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौकातून फडके रस्त्याने शोभायात्रा गणेश मंदिराकडे विसर्जित झाली.
विकासाबरोबर सांस्कृतिक भूक महत्त्वाची : आमचे शिवसेना-भाजपचे सरकार काही महिन्यांपूर्वीच सत्तेत येताच सर्वच सण, उत्सव साजरे करणाऱ्यावरील निर्बंध पहिले हटविले. संस्कृती, परंपरा टिकण्यासाठी सण, उत्सव साजरे होणे महत्त्वाचे आहे. विकासाबरोबर सांस्कृतिक भूक महत्त्वाची आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी शोभायात्रेच्या व्यासपीठावरून केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, मनसे आ. राजू पाटील, महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले, प्रवीण दुधे, मेघराज तुपांगे उपस्थित होते. शोभा यात्रे दरम्यान चौक चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकंदरीतच शोभा यात्रा शांततेत पार पडली.
हेही वाचा : Mission Thackeray Failed: शिंदेंच्या आडून भाजपचे 'मिशन ठाकरे' फेल.. भाजपने पाठवले केंद्रीय नेतृत्वाला पत्र