ठाणे : उद्धव ठाकरे यांनी अदानी प्रकरणावर शरद पवार यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अदानी समुहावरील हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी अदानी समूहाचे समर्थन केले आहे.
पवार अभ्यास करूनच बोलतात : शुक्रवारी रात्री कल्याणमध्ये एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'काँग्रेसने अदानी समूहातील 20 हजार कोटी रुपयांचे स्पष्टीकरण मागण्यासाठी आंदोलन सुरू केले. उद्धव ठाकरेही या विषयावर सातत्याने बोलत आहेत. आता शरद पवारांनीही यावर टिप्पणी केली आहे. जे याला विरोध करत आहेत त्यांनी त्यांच्या या टिप्पण्यांकडे लक्ष द्यावे. पवार हे खूप ज्येष्ठ राजकारणी आहेत. अदानी प्रकरणावर ते खूप अभ्यास करूनच बोलले असतील. म्हणूनच, विरोध करणार्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे'. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीसोबत सहयोगी आहेत.
राष्ट्रवादीने केले पवारांच्या भूमिकेचे समर्थन : अमेरिका स्थित हिंडेनबर्ग रिसर्चने दोन महिन्यांपूर्वी अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत व संसदेच्या बाहेर मोदी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, 'संसदेत अशा प्रकारची विधाने यापूर्वीही इतर व्यक्तींनी दिली होती. यावरून काही दिवस गदारोळही झाला होता. पण यावेळी या मुद्द्याला प्रमाणाबाहेर महत्त्व देण्यात आले आहे'. दुसरीकडे पुण्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'पक्ष आपल्या प्रमुखांना पाठिंबा देतो. या विषयावर आणि आम्ही आमच्या नेत्याच्या विचारांना पाठिंबा देतो आहे'.