ठाणे - मांगरूळ गावातील आरोग्य केंद्राच्या हालगर्जीपणामुळे एका आदिवसी महिलेची टेम्पोतच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच, येथील आरोग्य केंद्र बंद असल्याने, या महिलेला शहरातील शासकीय रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत ते बाळ दगावले. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणाचा पाढाच वाचून दाखवला आहे.
'आरोग्य केंद्र बंद असल्याने घडली घटना'
अंबरनाथ तालुक्यात मलंगगड परिसरातील म्हात्रेपाडा कातक़री वाडीत एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील वंदना वाघे यांच्या काल मध्यरात्रीच्या सुमारास पोटात दुखायला लागले. त्यानंतर नातेवाईक त्यांना जवळ असलेल्या मांगरूळ गावातील आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन गेले. मात्र, येथील आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हे आरोग्य केंद्र बंद आहे. दरम्यान, वंदना यांना येथील उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच वंदना यांची टेम्पोतच प्रसूती झाली. याच काळात नवजात बाळ दगावले. या घटनेनंतर वंदना यांचे नातेवाईक चांगलेच संतापले. मांगरुळ येथील आरोग्य केंद्र बंद असल्यानेच बाळ दगावले असा आरोप त्यांनी केला आहे.
'ही वर्षभरातील तिसरी घटना'
अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावात एकमेव आरोग्य केंद्र आहे. मात्र, या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उपचार येथे होत नाहीत. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी लांबच्या भागात भटकावे लागत आहे. त्याचाच परिणाम अशा गंभीर घटना घडत आहेत. हे आरोग्य केंद्र बंद असल्याने या वर्षभरातील वंदना यांच्याबाबत जी घटना घडली, तशा या वर्षात तीन घटना घडल्या आहेत. आणखी किती निष्पाप नवजात बालकांचा आपण जीव घेणार आहात, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांमध्ये संताप
ग्रामीण आरोग्य विभागातील कर्मचारी तपासणीसाठी आले असता बाळ दगावलेल्या महिलेला 9 महिन्यातून केवळ एकच इंजेक्शन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, या घटनेसारख्या वर्षभरात तीन घटना घडल्या आहेत. येथे गरोदर मातांना दिली जाणारी आरोग्य सुविधा योग्य मिळत नाही असेही या परिसरातील नागरिकांचे मत आहे. दरम्यान, आणखी किती निष्पाप नवजात बालकांचा जीव घेतल्यावर आरोग्य प्रशासनाला जाग येणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.