ठाणे - अस्वच्छतेचे आगार बनत चाललेल्या कामोठेतील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी शनिवारी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा जागर केला. स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करून या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कामोठेकरांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
हेही वाचा - धक्कादायक! केवळ 'या' शहराचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित; सर्व महानगरे निकषात नापास
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांनी पनवेलमधील याच कामोठेत साफसफाई करुन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. या गावातील शाळेचे शिक्षक हिरवे गुरुजींनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला आणि ते त्यात हुतात्मा झाले. त्यामुळे हिरवे गुरुजींचे गाव म्हणूनही हे गाव ओळखले जाते.
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील या गावाला आपली कर्मभूमी मानत. अशा समाजसेवेचा वसा प्राप्त झालेल्या कामोठेत सरकारी बाबूंना स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. ज्या पद्धतीने आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याच पद्धतीने आपला परिसर ही स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. हे पटवून देण्यासाठी कामोठेमधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागर स्वच्छतेचा या घोषवाक्याखाली पथनाट्ये सादर केली. पथनाट्य सादर करणारी सर्व विद्यार्थी हे शेतकरी तर कुणी मोल मजुरी करणाऱ्या घरातील आहेत. त्यांचे पथनाट्य पाहण्यासाठी गावात नागरीकांनी एकच गर्दी केली आणि सर्व विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.
पथनाट्याच्या माध्यमातून मनाची, परिसराची, आपल्या आरोग्याची स्वच्छता करणे का गरजेचे आहे, याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होते.
हेही वाचा - चंद्रपुरात हत्तीच्या हल्ल्यात माहुत जागीच ठार