ठाणे - पालिकेला सर्वाधिक कररूपाने महसूल देणाऱ्या आणि ५ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यात अतिवृष्टीने पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांनी ३ दिवस पाण्यात काढले. तर आज पाणी ओसरल्याने दिवावासीयांची सुटका झाली. परंतु, २६ जुलैपेक्षाही भयाण परिस्थितीत दिवावासी असताना पालिका प्रशासन, स्थानिक नेत्यांनी पाठ फिरविल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तब्बल आठवडाभर पावसाच्या रिपरिपने पूरस्थितीपेक्षा भयाण परिस्थिती शनिवारपासून दिवावासीयांनी अनुभवली. या पाण्यात घरातील संसार, गृहोपयोगी वस्तू, रेशन, कपडे वाहून गेले. तर भिजलेल्या उशा, गाद्या, कपडे, इलेट्रॉनिक वस्तू, घरातील फर्निचर लोकांनी कचराकुंडीत टाकून केवळ स्वतःचा जीव वाचविला. ३ दिवस कंबरइतके घरात पाणी, दिवाबत्ती गुल, पिण्याचे पाणी नाही अशा परिस्थितीत काही दिवावासी आप्तेष्टांकडे, नातेवाईकांकडे संसार पाण्यात सोडून गेले. यामुळे पाण्याखालच्या हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
चाळीत खाडीचे आणि अतिवृष्टीच्या पावसाचे पाणी घुसले. पूर्वीच आरोग्यसेवा, मूलभूत सुविधा, पाणी या सुविधांचा अभाव असलेल्या दिवावासीयांचे ३ दिवस पाण्याखाली आले. चाळीत खाडीचे घाण पाणी, नाल्याचे पाणी घुसल्याने आता दिवावासीयांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल ३ दिवस दिव्याचे बेडेकर नगर, आगासन गाव, बेतवडे, महातार्डी, दातिवली, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा साबेगाव, डी. जे. कॉम्प्लेक्स, बी. आर. नगर, वक्रतुंड नगर, विलास म्हात्रे गेट या खाडी लगतच सर्व चाळीचा आणि इमारतीचा परिसर पाण्याखाली आला. ३ दिवस पाण्यात असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी स्थानिक तरुणांनी गल्लीगल्लीतुन बोटी फिरवून मदत केली.
अशी परिस्थिती असताना ठाणे महापालिका प्रशासन, एनडीआरएफ, आपत्ती व्यस्थापन आदी फिरकलेसुद्धा नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ३ दिवस लाईट नसल्याने आणि पाण्याचे रामराज्य असल्याने दिवावासीयांचा संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती होती.
दरम्यान, आज पाणी ओसरल्यानंतर बाधित दिवावासी उरलेला संसार सावरत होते. पाऊस जरी चांगला झाला तरीही दिवावासी राजकीय नेत्यांचे आणि स्थानिक नगरसेवकांच्या उदासीनतेचे शिकार होत राहिले आहेत. ८ नगरसेवक असलेल्या दिव्यात कायमची पाणीटंचाई जाणवते. तर गटारातून पाण्याचे पाईप गेलेत. त्यामुळे दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांमध्ये रोगराई पसरली आहे. दिव्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. तसेच ५ लाख लोकसंख्या असलेला दिवा आरोग्य केंद्रापासून वंचित आहे.