ठाणे: पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (रविवारी) खारघर येथे आले होते. कार्यक्रमाला २० लाख श्री सदस्यांची उपस्थिती असल्याचे बोलले जाते. त्या अनुषंगाने शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती; मात्र भाविकांना भर उन्हात सहा तास बसवून ठेवण्यात आले. परिणामी 13 श्री सदस्यांना उष्माघाताने जीव गमवावा लागला.
आईसाठी मुलींचा शोधाशोध: कळवा परिसरात राहणाऱ्या भीमा साळवी तसेच पुष्पा गायकर या देखील या कार्यक्रमादरम्यान उष्माघाताच्या बळी ठरल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत या दोघीही घरी न परतल्याने ज्योत्सना हांडे आणि सारिका पाटील या दोन्ही मुलींनी आपापल्या आईंचा शोधाशोध सुरू केला. सुरुवातीला कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यांना त्रास झाला त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले; मात्र त्या ठिकाणीही या दोघींना त्यांच्या आई सापडल्या नाहीत. पोलीस ठाणे, हॉस्पिटल अशी अनेक ठिकाणे शोधल्यानंतर अखेर एका रुग्णालयात शोध लागला; मात्र रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले होते.
शासनाच्या नियोजनावर टीका: एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेता तर नियोजन व्हायला हवे होते. माणसांचा जीव जाईल असे नियोजनशून्य कार्यक्रम यापुढे घेऊ नका, असा संताप मृत भीमा साळवी यांची मुलगी ज्योत्स्ना हांडे यांनी व्यक्त केला आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या माणसांचा जीव गेला. पैशांची मदत करण्यापेक्षा आमच्या भावांना शासकीय नोकरी लावली तर आईला खरी श्रद्धांजली मिळेल, अशी मागणी मृतक पुष्पा गायकर यांची मुलगी सारिका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मृतदेह मिळवण्यासाठी देखील झाले हाल : या संपूर्ण कार्यक्रमानंतर नियोजनाच्या अभावामुळे जखमी आणि मृत झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाला आणि मृतदेह घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नातेवाईकांना शोधणे मोठे कठीण झाले होते. त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांना मृतदेह घेण्यासाठी मोठे हाल सोसावे लागले.
हेही वाचा: NIA seizes School : पुण्यात आखला जात होता दहशतवादी कारवायांचा प्लॅन; NIA ची मोठी कारवाई