नवी मुंबई - सिडकोमध्ये कार्यरत विकास अधिकारी भरत ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावणे सहा अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. ठाकूर यांच्या तोंडाला काळे लावणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांविरोधात सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सिडको प्रशासनानेही संबधित अधिकाऱ्यांविरोधात दक्षता समितीमार्फत विभागीय चौकशी सुरू केली आहे.
तोंडाला काळं फासण्याचा आरोप असणाऱ्या अधिकाऱ्याने ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.
सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 2019 ला भरत ठाकूर हे सिडकोच्या सामान्य प्रशासन विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या विभागात काम करणारे सहायक विकास अधिकारी मयूर आगवणे यांनी मे 2019 भरत ठाकूर हे मानसिक त्रास देत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. तसेच सिडको कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी नीलेश तांडेल, विनोद पाटील, यतिश पाटील, विकास मुकादम, अतिम म्हात्रे आणि जे. टी. पाटील यांनी ठाकूर यांच्या तोंडाला शाई लावली.
त्यानंतर अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ करत पुन्हा सिडको कार्यालयात न येण्याची धमकी दिली होती. ठाकूर यांनी सर्वांना समजावण्याचे प्रयत्न केले होते; मात्र त्यांचे कोणीही ऐकू न घेता शिवीगाळ व मारहाण केली. यामुळे ठाकूर यांनी संबधित व्यक्तींच्या विरोधात सिडको प्रशासनाकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती, सिडको व्यवस्थापनाने काळं फासून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी उलट भरत ठाकूर यांची एक महिन्याने औरंगाबाद कार्यालयात बदली केली. 26 फेब्रुवारी 2020 ला औरंगाबादहून ठाकूर यांची पुन्हा सिडकोच्या नवी मुंबई कार्यालयात बदली झाली. तेव्हा ठाकूर यांनी सहा जणांवर केलेल्या कारवाईबाबत विचारणा केली असता, सिडकोने कोणतीच कारवाई न केल्याची बाब समोर आली. तेव्हा ठाकूर यांनी स्वतःला न्याय मिळण्यासाठी सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि धमकावल्याबाबत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
संबधित प्रकरणाचा तपास सुरू असून, सहा आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. मात्र, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे सहायक पोलीस आयुक्त भरत गाडे यांनी सांगितले आहे.