ठाणे Chopper Attack On Hotel Staff : सीसीटीव्ही फूटेजमध्ये हॉटेलमध्ये उपस्थित असलेले वेटर आणि इतर कर्मचारी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण दिलेली ऑर्डर लोकांना आल्यानं संतापलेल्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. ओंकार भोसले आणि त्याचा मित्र अभी पाटील असं या गुंडांचं नाव आहे. (hooligans in hotel) इतर एक जण अज्ञात आहे.
हॉटेल स्टाफवर चॉपरने हल्ला: घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड आझादनगर येथे सागर गोल्डन हिलटॉप नावाचं हॉटेल आहे. काल रात्री ओंकार भोसले आणि त्याचा मित्र अभी पाटील हे मद्यपान आणि जेवण करण्यासाठी या हॉटेलमध्ये आले होते. दरम्यान वेटरला त्यांची ऑर्डर घेण्यास वेळ लागला. यामुळे संतापलेल्या ओंकार भोसले याने बसलेले टेबल उलटून लावले आणि त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हॉटेल व्यवस्थापनाकडून मिळालेल्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्त करत दोन्ही आरोपींनी चक्क चॉपर घेऊन तेथील वेटर आणि कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यात एका वेटर आणि इतर कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून त्यांना जवळच्या सरकारी इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. याबाबतचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आला. मात्र, आरोपींना शोधण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेलं नाही.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुंड मोकाट: ठाणे हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, त्यांच्या बालेकिल्ल्यातच कायदा आणि सुव्यवस्थेचे असे धिंडवडे निघाले असल्यानं नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. केवळ दारू, जेवण लवकर आणले नाही या क्षुल्लक कारणावरून दोन सामान्य नागरिकांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं ही निश्चितच लाजिरवाणी गोष्ट आहे.
गुंडांकडून वाहनाची तोडफोड: गुंडांकडून यापूर्वीही अनेक शहरात तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नाशिक शहरातील जुने सिडको परिसरात 26 ऑगस्ट, 2023 रोजी घडली. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक साईबाबा मंदिर मागील बाजू येथे अज्ञात टवाळखोरांनी 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून टोळक्यानी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
हेही वाचा: