ठाणे : मृतक रेहान अमीन शेख हा कल्याण पूर्वेतील आयडीएल हायस्कूलमध्ये इयत्ता ५वीत शिक्षण घेत होता. २५ मार्च रोजी तो सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेतील कैलाश नगर मधील रवी हॉटेलच्या समोर, राय पॅराडाईजच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडलेला बॉल काढत असताना, त्याचा पाय घसरून तोही पाण्यात पडला होता. त्यामध्ये त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा खड्डा बेकायदा बांधकामासाठी भूमाफियांनी खोदला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खड्ड्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण कडे नसल्यानेच ही घटना घडली. मात्र, कोळसेवाडी पोलिसांनी खड्डा खोदणाऱ्या विरोधात कारवाई न करता रेहानचा मृत्यू आकस्मित झाल्याची नोंद केली. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पालिका अधिकारीही घटनेला जबाबदार : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी रेहानचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला होता. हा खड्डा खोदणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारीही या घटनेला तितकेच जबाबदार आहेत, असा आरोपही नागरिकांनी केला. खळबळजनक बाब म्हणजे, गेल्या आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी जवळ रस्ते कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन दिवसांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आणखी एका मुलाचा मृत्यू : विशेष म्हणजे, या घटनेच्या दिवशी नेवाळी परिसरातील नागरिकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी 'रस्ता रोको आंदोलन' केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेत आणखी एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे ठेकेदार, बेकायदा बांधकाम करणारे भूमाफिया यांच्या निष्काळजीपणामुळे तिन्ही बालकांचे बळी गेल्याची टीका नागरिक करीत आहेत. रेहानच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरू आहे. वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.