ठाणे : सध्या देशात आयपीएलचा मोसम सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळतो आहे. तुषार देशपांडेची 2007 साली मुंबईतील 13 वर्षीखालील मुलांच्या संघात निवड झाली होती. तेव्हापासूनच त्याने क्रिकेट जगतात उत्तुंग भरारी घेतली आहे. मात्र क्रिकेट सोबतच त्याची क्रिकेटच्या बाहेरील इनींगही थक्क करणारी आहे.
तुषारला घरातूनच मिळाले क्रिकेटचे बाळकडू : तुषार देशपांडेचा जन्म 15 मे 1995 रोजी झाला. त्याचे आईवडील दोघेही सरकारी नोकरीत होते. तुषारचे वडील उदय देशपांडे यांना किक्रेटची खूप आवड होती. तेही किक्रेट खेळत असत. आपले क्रिकेटर होण्याचे स्वप्न तुषार पूर्ण करेल अशी आशा बाळगून त्यांनी तुषारला शालेय जीवनापासूनच क्रिकेटचे धडे गिरवले. तुषारने कल्याणमधील केसी गांधी स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे याच शाळेतील प्रणव धनावडेने एका डावात 1000 धावांचा जागतिक रेकॉड केला होता. आता त्याच्या नंतर तुषारने क्रिकेटमध्ये नाव केले आहे.
आईचे कर्करोगामुळे निधन झाले : मैदानासह तुषारची मैदानाबाहेरील इनिंगही थक्क करणारी आहे. तुषारचे वडील उदय देशपांडे सांगतात की, तुषारने वैयक्तिक जीवनातील आव्हानात्मक काळातही स्वत:ला सावरले आहे. 2019 मध्ये कर्करोगामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला. ही त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. एकुलता एक मुलगा असल्याने हा धक्का सहन करणे त्याच्यासाठी कठीण होते. त्याकाळात तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याची आई गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याला एक स्पर्धाही गमावली लागली होती. मात्र त्यानंतरही मी त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. तुषारच्या आईचा मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच तो इंदूरला मुश्ताक अली ट्रॉफी खेळायला गेला होता, असे त्याचे वडील सांगतात. तुषारच्या आईला तुषारला मोठा क्रिकेटर झालेला पाहायचे होते. ज्या वर्षी त्याच्या आईचे निधन झाले त्या वर्षी तो भारत अ संघाकडून सर्व स्पर्धा खेळला असल्याचे त्याचे वडील उदय देशपांडे यांनी आवर्जून सांगितले.
यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी : आयपीएल सुरु होण्यापूर्वी तुषारने यंदाच्या मोसमात मुंबई संघाकडून 6 रणजी सामने खेळले. यामध्ये त्याने 185 षटके टाकली आणि 25.69 च्या सरासरीने 23 बळी घेतले होते. तर सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये तुषारने 11 सामन्यात 19 बळी घेऊन पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. नुकतेच मुंबंईतील वानखेडे स्टेडियमवर तुषारने मुंबई इंडियन्सचा कर्णधार व भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा देखील बळी घेतला होता. सध्या तुषार 27 वर्षाचा असून आता त्याचे पुढील लक्ष भारतीय संघात स्थान मिळविण्याचे आहे.
हेही वाचा :