ठाणे - नवी मुंबईत रसायने व औषध कंपन्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने सोडली जात आहे. यामुळे नागरिकांना, प्राण्यांना तसेच पर्यावरणाला देखील हानी होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असे प्रकार सुरू असूनही पालिका प्रशासन यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
हेही वाचा - VIDEO : पालघरच्या कोटुंबी नदीत उलटला रसायनांनी भरलेला टँकर, पाण्यात तयार झाला फेस
घणसोली नाल्यात वेगवेगळ्या रंगाचे पाणी रबाळे आौद्योगिक विकास महामंडळमधुन (एमआयडीसी) सोडण्यात येत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरात औषधी कंपन्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पर्यावरणासाठी ते धोकादायक ठरत आहे. या कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी पाणी नाल्यांमध्ये सोडत आहेत.
गल्ली आणि रस्त्याच्या किनारी असलेल्या नाल्यांमधून रसायनयुक्त घाण पाण्यामुळे विविध आजार जोमाने पसरत आहेत. रसायनयुक्त पाणी गटारांमधून समुद्रात व खाडीपर्यंत पोहोचत आहे. हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगाचे रासायनिक पाणी मासे आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. केमिकलचे पाणी गटारे, नाल्यांमधून बिनधास्तपणे सोडून दिल्याने या रसायनांच्या उग्र वासामुळे अनेकांना श्वसनाचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. कंपन्यांमुळे वायू आणि जल प्रदूषण वाढत चालले आहे. रसायनांच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. यामुळे परिसरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
हेही वाचा - राष्ट्रवादीने मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक; राजकीय घडामोडींना वेग