ठाणे - विवाहाचे नाटक करुन पतीकडून दागिने आणि पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. ठाण्याच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीवर पतीने गुन्हा दाखल केला. तरुणीसोबत तिच्या आई आणि मावशीलादेखील अटक करण्यात आली आहे. रिना देवरे असे आरोपी तरुणीचे नाव आहे. तर मंगला देवरे आई आणि सुनीता माहिरे असे मावशीचे नाव आहे.
नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन व्हायची फरार
विवाहासाठी वधू शोधणाऱ्या तरुणाची आरोपी तरुणीची आई आणि मावशी या दोघी भेट घ्यायच्या आणि विवाहासाठी मुलगी असल्याचे त्यांना सांगायच्या. मुलीचे आईवडील नाहीत. ती खूप गरीब आहे, अशी थाप मारून संबधित तरुणाला जाळ्यात ओढून रीनाशी विवाह लावत असत. मात्र, विवाह झाल्यानंतर रिना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची. जाताना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन फरार व्हायची. विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता प्रत्येकवेळी विवाह करताना देत असल्याने त्या सापडत नव्हत्या. ३० मार्च रोजी भिवंडीतील भादवड येथील हरेश पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला. ती भादवड येथील हरेश यांच्या घरी आली. सुरुवातीला तिने हरेशकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार घेतले. २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला, असे सांगून ५० हजार रुपये खात्यात जमा करून घेतले.
असा उघडकीस आला प्रकार…
आरोपी रिना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणासोबत जुळवून आणला. या तरुणाकडून रिनाने ६० हजार रुपये घेतले होते. त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रिना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. त्यासाठी पतीला आईची तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. मात्र, पतीने मीही सोबत येतो, असे सांगितल्यानंतर रिना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली. अखेर, पत्नीच्या वागण्याचा हरेश याला संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिना, मंगला व सुनीता यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिलपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.