ठाणे - लकी ड्रॉमध्ये स्कूटी गाडी बक्षिस मिळाल्याची थाप मारून रोख रक्कम आणि दागिने घेऊन दोन भामट्यांनी पोबारा केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील देवगाव येथे घडली आहे. यातील एक जण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून मुरबाड पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरू केला आहे.
मुरबाड तालुक्यातील देवगाव येथील जगदीश कवटे यांना गुरुवारी भोसले नावाच्या व्यक्तीने फोन केला. मागील वर्षी आपण काढलेल्या 'लकी ड्रॉ'मध्ये तुम्हाला स्कूटी गाडी बक्षिस मिळाली आहे. त्यासाठी आपल्याला काही रक्कम भरावी लागेल, असे सांगून भूरळ घालत घरातील महिलेच्या कानातले १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि आठ हजार रोख रक्कम घेऊन पसार झाले.
हेही वाचा - पुण्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना विविध ठिकाणाहून अटक, 28 लाखांचे मादक पदार्थ जप्त
दरम्यान, देवगाव येथे मागील वर्षीही एकाने महिलेस भूरळ पाडून अडीच लाखांचे दागिने लंपास केले होते. फसवणुकीच्या अशा घटनांतील एकही आरोपीचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. मात्र, गुरुवारच्या घटनेत कवटे यांनी या चोरट्यांपैकी एकाचा गुपचूप व्हिडीओ काढल्याने त्याचा फोटो उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या टोळीचा तपास लागण्याची शक्यता मुरबाड पोलिसांकडून वर्तवली जात आहे.