मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पूर्वेच्या प्रमोद महाजन समर्पित कोविड रुग्णालयात डॉक्टर गौतम टाकळगावकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करणे, सरकारी कामात अडथळा, अश्या एकूण २५ कलमांतर्गत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने समाज माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी घटना काय -
१४ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास एका कोरोना बाधिक रुग्णाला भाईंदर पूर्वेच्या प्रमोद महाजन समर्पित कोविड रुग्णालय दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र, रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रवेश केला. त्यावेळी रुग्णालयात कर्तव्य बजावणारे रुग्णालय व्यवस्थापनाने ड्युटीवर असलेले डॉ. जय यांना या बाबत माहिती दिली. त्यावेळी डॉ. जय यांनी त्यांची तपासणी करून मृत असल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल करण्याअगोदर रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. गौतम टाकळगावकर यांच्या कॅबिनमध्ये घुसून शिवीगाळ केली. तसेच ज्या ठिकाणी कोविड रुग्ण दाखल आहेत, त्याठिकाणी जाऊन आरडाओरडा केली. त्यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. प्रकरण शांत केले. त्यानंतर डॉ.गौतम टाकळगावकर त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
डॉक्टरांनी संयमाने वागायला हवे -
संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला असून त्यातच मीरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या आणीबाणीच्या परिस्थितीत डॉक्टर, नर्स, सफाई, कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. त्यातच डॉक्टरांचे मनोबल कमी झाल्यास भविष्यात अधिक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांच्याशी संयमाने वागले पाहिजे, असे मत समाजसेवक अनिल भगत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - ऑक्सिजन पुरवठ्यासाठी कळंबोलीतून विशेष ट्रेन; विशाखापट्टणम येथून आणणार ऑक्सिजन