ठाणे: भिवंडीतील कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अनेक तक्रारी महापालिका आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. अशाच एका तक्रारीनंतर भिवंडी शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी चार बोगस डॉक्टरांवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत चारही बोगस डॉक्टरांना अटक केली आहे.
दवाखान्यातील साहित्य जप्त: हरीशंकर पटेल (रा.नारपोली), रुद्रण रंजित राय (एकतानगर ,नारपोली), राजेंद्रप्रसाद हंसराज पटेल आणि राधेश्याम कालिका चौधरी (दोघे रा.रामनगर,अंजुरफाटा) अशी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. भिवंडीतील नारपोली भागात बोगस डाॅक्टर व्यवसाय थाटून नागरिकांवर उपचार करत असल्याची माहिती भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांना मिळाली होती.
बोगस डॉक्टरांना अटक: भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय पथक आणि नारपोली पोलिसांनी येथील नारपोली, एकतानगर, अंजुरफाटा या भागात शुक्रवारी पाहणी केली असता, हरीशंकर पटेल, रुद्रण राय, राजेंद्रप्रसाद पटेल आणि राधेश्याम चौधरी हे बोगस डाॅक्टर आढळून आले. त्यांची पंचांसमक्ष चौकशी केली असता त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नसल्याने याप्रकरणी त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन व दवाखान्यातील साहित्य जप्त करण्यात आली आहे.
रुग्णांचे आरोग्य धोक्यात: भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भिवंडीत मोठ्या प्रमाणात बनावट वैद्य अवैधपणे दवाखान्यांचा थाट मांडून बसले आहेत. भिवंडीत सन २०१५ पासून १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अवैधरित्या दवाखाने चालवणाऱ्या २२ बोगस वैद्यांवर महापालिका प्रशासनाने धाड टाकून कारवाई करत शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल: भिवंडी येथे बोगस डॉक्टर पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. एका तक्रारीनंतर भिवंडी शहरातील हमाल वाडा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल करून मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी (४६) व रायला मुशर्रफ मोमीन (४०) या बोगस डॉक्टर पतीपत्नीवर गुन्हा दाखल करून अटक कारवाई करण्यात आली होती.
आतापर्यत २२ बोगस मुन्नाभाईंवर कारवाई: बोगस डॉक्टरांना अटक केल्यानंतरही असे मुन्नाभाईंची दुकाने शहरांत सर्रासपणे सुरू आहेत. भिवंडी शहरातील सर्वेक्षणानुसार गल्लीबोळात तसेच सर्जन ठिकाणीही अवैधपणे रुग्णालये चालवली जात आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने शैक्षणिक अर्हता नसणारे २२ जणांच्या अवैधपणे सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये २०१५ पासून आतापर्यत अवैधरित्या दवाखाने चालवणाऱ्या २२ बोगस वैद्यांवर महापालिका प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कायद्यान्वये शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: Fake Doctor Detained in Amravati : अमरावतीत सापडला बोगस डॉक्टर ; पोलिसांनी केला गुन्हा दाखल