नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली आहे. यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करत आहेत. अशाच प्रकारे नियमांचा भंग केल्यामुळे पनवेलमधील ओरियन माॅलमधील बिग बझारवर गुन्हा दाखल झाला आहे.
![ओरियन माॅलमधील बिग बझारवर गुन्हा दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tna-01-coronapanvel-mhc10065_23052020002723_2305f_1590173843_460.jpg)
कोरोनाचा प्रकोप कमी व्हावा, यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. परंतु, दैनंदिन जीवनही त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला दिलेला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. मात्र, काही दुकानदार, विक्रेते, व्यावसायिक वैयक्तिक फायद्यासाठी प्रशासकीय आदेश गुंडाळून ठेवत आहेत. अशा स्थितीत संबंधितांवर कारवाई केली जात आहे.
![ओरियन माॅलमधील बिग बझारवर गुन्हा दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7311150_348_7311150_1590201030360.png)
पनवेल ओरियन मॉल मध्ये आज शुक्रवार असताना दुकान सुरू करण्यास परवानगी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती 'ड' चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सदरचे दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोणी लाॅकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले आहे.