ठाणे - शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आढळून येत आहेत. त्यातच रोज खड्ड्यांमुळे कुठेनाकुठे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. असाच एक अपघात समोर आला असून, रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात कार ही चालकासह पुलावरून थेट नदीत कोसळली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील भातसा नदीवर असलेल्या सापगाव पुलावर घडली आहे. विकास शिर्के असे कार चालकाचे नाव असून, त्याचा जीव बचावला आहे.
हेही वाचा - दिवाळीनंतर महाविद्यालय होणार सुरू, पण... - मंत्री उदय सामंत
- नागरिकांनी तत्परता दाखवून चालकाला काढले बाहेर -
शहापूर - मुरबाड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. भातसा नदीवरील सापगाव पुलावर देखील प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच पुलावरील खड्डे चुकवण्याच्या नादात तालुक्यातील शेणवे येथील रहिवासी विकास शिर्के यांचा अपघात झाला. त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट भातसा नदी पात्रात पडली. यावेळी येथे उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवून कार चालकाला बाहेर काढून उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शहापूर-मुरबाड रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश