नवी मुंबई- पनवेलमधील उलवे नोडमधील ओला कॅब चालक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चालक 60 पेक्षा अधिक लोकांच्या संपर्कात आला होता, या लोकांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यापैकी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पनवेल मधील उलवे नोडमध्ये आढळलेल्या चार कोरोनाबाधितापैकी 28 तारखेला उलवेमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्याप्रमाणे ही महिला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होती. प्रशासनाच्या माध्यमातून, महिलेच्या दररोज संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा शोध घेण्यात आला. यानंतर कोरोनाच्या अनुषंगाने त्या महिलेच्या तीन मुली व ओला कॅब चालक यांची तपासणी करण्यात आली. महिलेच्या एका मुलीचे अहवाल कोरोना निगेटीव्ह आले होते. मात्र, ओला कॅब चालकासह दोन मुलींचे अहवाल पॉझिटिव्ह आले व त्यांच्याही संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला.
ओला कॅब चालकाने किती प्रवाशांना घेऊन प्रवास केला असल्याचाही शोध घेण्यात आला असता, त्यात 60 लोकांचा समावेश असून, या लोकांचा प्रशासनाने शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. त्यात एका मुंबईतील महिला डॉक्टरचा समावेश होता, त्या डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टर 29 तारखेपर्यत मुंबई उपनगरातील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. ते हॉस्पिटल सील करून, ज्या ज्या लोकांवर कोरोनाबाधित डॉक्टरने उपचार केले होते. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही होम क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच एका बॅंकेच्या कर्मचाऱ्यालाही ओला कॅब ड्रायव्हरच्या संपर्कात आल्याने कोरोना झाल्याचे प्रशासनाने घेतलेल्या शोधत कळले आहे. सद्यस्थितीत या कॅब चालकावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .