ठाणे- सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जमान्यात भरकटत जाणाऱ्या नव्या पिढीला संतांच्या महान कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. म्हणून ठाण्यात एक भव्य 'संत सहवास' नावाची इमारत बांधणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली. तसेच विठ्ठल रखुमाईच्या पवित्र मूर्ती भाविकांना वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून सर्व संतांचे इष्ट देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. त्याच्या दर्शनाच्या ओढीने दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीला जाऊन आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. परंतु, अनेकांना वारीत सामील होता येत नाही. अशा भक्तांसाठी काळ्या पाषाणापासून बनलेल्या विठ्ठल रखुमाईच्या पवित्र मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या मूर्ती चंद्रभागेच्या पाण्यात पवित्र करून आणल्या असून या मूर्ती भाविकांना वाटण्यात येणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. सदर संत सहवासात सर्व संतांच्या मूर्ती ठेवण्यात येणार असून त्यांच्या जीवनातील सार येथे वर्णिले जाणार असल्याचे ते म्हणाले.