ठाणे: मृतक कीर्ती रविंद्रन व रणजित रविंद्रन हे भाऊ-बहिणी कुटुंबासह डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या उमेश नगर परिसरात राहत होते. मृतक रणजीत हा 'एमबीबीएस'च्या शेवटच्या वर्षाला होता तर कीर्तीने यंदा बारावीमध्ये प्रवेश घेतला होता. दोघांचे आई-वडील कामानिमित्त मूळ गावी गेले होते. त्यातच त्यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे. याला आंघोळ घालण्यासाठी आज (रविवारी) दुपारच्या सुमारास बहीण-भाऊ हे दोघेही जण स्कूटरने डोंबिवली पूर्व भागातील कल्याण शीळ मार्गावरील दावडी परिसरातील तलावावर गेले होते.
अशी घडली दुर्घटना: तलावावर आल्यानंतर दोघेही कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी तलावात उतरले होते. मात्र, तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाचे पथक, मानपाडा पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर शोध कार्य सुरू केले असता तासाभराच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह तलावातून काढण्यात पथकाला यश आले. आश्चर्य म्हणजे, या दुर्घटनेतून त्यांचा पाळीव कुत्रा बचावला आहे.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर: बहीण-भावाच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने उमेश नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाप-लेकाचा बुडून मृत्यू: जालना शहरातील मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणापैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 26 एप्रिल, 2022 रोजी दुपारी पाचच्या सुमारास ही घटना घडली. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना आपला मुलगा बुडत असल्याचं पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप- लेक बुडाले. घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून या बाप- लेकाचा शोध घेत मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेने परिसरात एकाच हळहळ व्यक्त केली जात आहे.