ठाणे - विवाहित प्रेयसीने सोबत राहायला नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपील अवघ्या सहा तासाच्या आत बेडय़ा ठोकल्या. दिनेश तिवारी (४०)असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे.
प्रियकरासोबत झाला वाद -
डोंबिवलीच्या पूर्व भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचे दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. कालातरांने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तीन महिने ही महिला आरोपी दिनेशसोबत राहिली. त्यांनतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने ती महिला पुन्हा पहिल्या पतीकडे परत गेली.
चिमुकलीचे आईच्या कुशीतून अपहरण -
पीडित महिलेला दोन मुली असून एक 6 वर्षाची तर दुसरी तीन वर्षाची आहे. आरोपी दिनेश हा तीन दिवसापूर्वी महिलेला भेटण्यासाठी आला असता त्याने पुन्हा सोबत राहण्यासाठी हट्ट केला. मात्र महिलेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यावरून त्याच्यांत वाद झाला, तिने शेजारांच्या मदतीने त्याला पिटाळून लावले. याचा राग मनात धरून दिनेशने तिच्या तीन वर्षाच्या चिमुकलीला कुशीत झोपली असतानाच अपहरण केले.
अवघ्या सहा तासात आरोपीला अटक -
या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. मात्र पोलिसांकडे या घटनेविषयी कोणताही सुगावा नव्हता. तेव्हा एका महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा एका मित्रसोबत वाद झाला होता. या एकाच धाग्याच्या आधारे मानपाडा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि अवघ्या सहा तासाच सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे, श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने आरोपीला बेडय़ा ठोकल्या तसेच त्या चिमुकलीस तिच्या आईच्या स्वाधीन केले.