ठाणे - एका तरुणाने झोमॅटो या ऑनलाईन फुड डिलीवरी अॅपवरून 127 रुपयांची जेवणाची ऑर्डर केली. जेवणाचे पैसेही त्याने ऑनलाईनच ट्रान्सफर केले. मात्र, 127 रुपयांची ही जेवणाची ऑर्डर या तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. जेवण तर मिळाले नाहीच उलट 49 हजार 160 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली. पंकज तिवारी असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोखळी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिममधील गांधारी रॉयल परेडाईज येथे राहणाऱ्या पंकज तिवारी याने झोमॅटो अॅपवरून जेवण ऑर्डर करत 127 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. काही वेळाने त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तिने घराचा पत्ता सापडत नसल्याचे संगितले. त्यामुळे तिवारी यांने ऑर्डर कॅन्सल करून पैसे परत देण्यास सांगितले. अज्ञात व्यक्तिने पंकजला 5 रुपये जीएसटी भरण्यास सांगून मोबाईलवर एक लिंक पाठवली, ही लिंक ओपन करून पंकजने जीएसटीचे 5 रुपये देखील ट्रान्सफर केले.
हेही वाचा -अल्पवयीन गर्भवतीचा आढळला जळालेला मृतदेह , संशयावरुन पिता पोलिसांच्या ताब्यात
त्यानंतर काही तासातच पंकजच्या दोन बँक खात्यांतून एकूण 49 हजार 160 रुपये आपोआप ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खडकपाडा पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.